Library

Thursday, April 8, 2010

ढजझ १०

परीक्षा आणि निकालांचे हे दिवस..
भविष्यात कुठलं करिअर निवडायचं
या विचारात सध्या अनेकजण असतील.
काहीजण नोकरीत आलेला 'तोच तो' पण
कसा घालवायचा आणि कसं जिदादिलीनं
जगायचं आयुष्य म्हणून झगडत असतील..
ठरवायचं म्हटलं तरी काही ठरवताच
येत नाही असंही वाटत असेल कुणाकुणाला..
मनातल्या अशाच काही प्रश्नांची उकल
कशी शोधायची हे सांगणाऱ्या काही
प्रेरणादायी गोष्टी..
प्रेरणेचं बी मनामनात रुजवणारी
आणि जगण्याला दिशा देणारी ही
विचारसूत्रे. विप्रोचे संस्थापक
अझिम प्रेमजी यांनी आयआयटी
दिल्लीच्या पदवीदान सोहळ्यात
केलेल्या भाषणाचा संपादित संक्षिप्त
अनुवाद..


जगण्याची एक गंम्मत असते..
एखादी गोष्ट हातून निसटायला लागली की आपल्याला तिची कदर वाटू लागते. माझे केस काळ्याचे पांढरे झाले आणि मग पांढरे केसही उडून गेले तेव्हा कुठे तारुण्यातला जोष आणि उत्साह ही किती महत्वाची गोष्ट असते हे मला जाणवायला लागलं. जगण्याच्या या प्रवासाने जे धडे शिकवले त्याचीही कदर याच वळणावर वाटू लागली. माझ्या अनुभवातून जे मी कमावलं ते कदाचित तुम्हाला करिअरची सुरुवात करताना थोडंफार उपयोगी पडावं..
मी करिअर सुरू केलं तेव्हाचं जग आणि आजचं जग यात प्रचंड अंतर आहे. साठीच्या दशकातला भारत दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीवर जगत होता; अन्नधान्यासारख्या अत्यंत मूलभूत गरजाही भागवणं मुश्किल होतं. परदेशी गेलं की लोक आपल्याकडे दयाभावनेनं पहायचे. पण आता काळ बदललाय; पुर्वी जेव्हा विदेशी माणसं भारतात यायची तेव्हा या देशासाठी आपल्याला काय मदत देता येऊ शकेल असा विचार करत यायची; पण आता ते विचार करतात की भारत आपल्याला काय मदत करू शकेल..!
एक अत्यंत आशावादी भारतीय म्हणून देशाची ही प्रगती पाहताना मला नेहमी वाटतं की परंपरा-संस्कृती म्हणून आपला देश समृद्ध आहेच; पण आता धर्मनिरपेक्ष-प्रभावी लोकशाहीच्या माध्यमातून आपण उत्तम समाजही घडवू शकतो.
मात्र त्यासाठी तुम्हाला या देशाची सूत्रं आपल्या हातात घ्यावी लागतील...

१) टेक चार्ज
चार दशकांपुर्वी मी अमळनेरच्या विप्रो फॅक्टरीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. फक्त २१ वर्षांचा होतो. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग स्कुलमधे काही वर्षे अभ्यास करुन परतलो होतो. खूप लोकांनी मला सल्ला दिला की भरभक्कम पगाराची नोकरी शोध कशाला उगीच तेलाच्या धंद्यात पडतोस ? आज मागे वळून पाहताना वाटतं की नशिब मी तो सल्ला मानला नाही आणि तो तेल उद्योग हातात घेतला. मला वाटतं आपण काय करायला हवं हे आपलाच आतला आवाज आपल्याला सतत सांगत असतो. कितीही सैरभैर वाटलं, निर्णय घेणं मुश्किल असलं तरी नेमकं काय करायला हवं हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. तुम्ही ऐकला तो आवाज, ऐकलं स्वत:च्या मनाचं तर तुमचा स्वत:वर भरवसा आहे असं समजा..
आणि करिअर निवडण्याची; आपले मार्ग शोधण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा स्वत:चे निर्णय स्वत:च्या हातात घ्या..

२) कमाई कसली? - आनंदाची?
कष्टानं कमावलेल्या एका रूपयाची किम्मत ही सापडलेल्या पाच रूपयांपेक्षा जास्त असते. जे चटकन येतं ते चटकन निघूनही जातं हा जुना नियम तुम्हाला माहितीच आहे. आपण जे कष्टानं कमावतो त्याचं मोल आपल्यालाच कळतं. त्यामुळे कष्टातून होणाऱ्या आनंदाची कमाई स्वत:ची स्वत: करा..!

३) अपयश चालेल.. यशाचा धोका..!
प्रत्येकवेळी प्रत्येक सामन्यात शतक ठोकणं कुणालाच जमत नाही. आयुष्याच्या वाटेवर कितीतरी आव्हानं असतात, त्यांना भिडलं की काहींवर आपण मात करतो काही आपल्यावर. आपलं जिंकणं आपल्याला मनापासून साजरं करता यायलाच हवं. पण जिकण्याची नशा डोक्यात गेली की त्याक्षणी हारण्याच्या घसरगुंडीवर आपण चढलेलो असतो, तेवढं टाळता आलं पाहिजे. पण नेहमीच यश कसं येईल अपयशही येतंच वाट्याला, यशपयाशाच्याच चक्राचा भाग म्हणून ते स्वीकारा आणि पुढे चला. फक्त विसरु नका तो त्या अपयशाने शिकवलेला धडा.

४) आत्मविश्वास आणि उद्धटपणा..
आत्मविश्वास आणि उद्धटपणा अगदी पातळ अदृश्य रेषा असते. फरक असतो तो एवढाच की ज्या लोकांकडे दांडगा आत्मविश्वास असतो ते नवनव्या गोष्टी शिकायला सतत तयार असतात. अलिकडेच युरोपात एक सर्वेक्षण करण्यात आलं..ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांच्या अंगी सगळ्यात मोठी कुठली क्षमता हवी असेल तर ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीतून नवनवे धडे सतत शिकण्याची. याउलट जी माणसं उध्दट असतात त्यांचं शिक्षण कधीच थांबलेलं असतं. आपल्याला सगळं येतं, आपल्याला सगळं माहिती आहे, कुणी काही सांगण्याची, नवं काही शिकण्याची काहीच गरज नाही असं त्यांना वाटू लागतं.

५) भूक.. नव्या मार्गाची..!
एखादी गोष्ट आपल्याला खूप चांगली जमते, उत्तम करता येते पण त्याचा अर्थ असा नाही की ती करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो. आपण करतो त्यापेक्षाही उत्तमरीतीने ते काम करता येऊ शकतं, त्याहूनही उत्कृष्ट काम आपल्या हातून घडू शकतं हे लक्षात ठेवा. परिपूर्णता हे काही यशाचं शिखर नव्हे तर यशापर्यंत पोहचण्याचा तो अखंड चालणार प्रवास आहे. कल्पकता आणि सृजनशिलतेला प्रेरणेची आणि शिस्तीची कायम गरज असते. कल्पकता आणि उत्तमतेचा ध्यास या दोन गोष्टींना पर्याय नाही.

६) रिअॅक्ट करू नका; प्रतिसाद द्या..
मतभेद असतातच. यश-अपयशाच्या टप्यातचही द्विधा असतेच मनाची. मग दोन स्वतंत्र व्यक्तींमधेही मतभेद असणं अस्वाभाविक नाही. पण प्रतिक्रिया देणं आणि प्रतिसाद देणं यात फरक असतो..! आपण प्रतिसाद देतो तेव्हा शांतपणे विचार करतो, जे योग्य आहे ते विचारपूर्वक सांगतो. आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असतं. पण आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपलं आपल्यावर नियंत्रण नसतं. जे समोरच्याला अपेक्षित आहे किवा जे आपल्यालाही अपेक्षित नसतं तेच आपण बोलतो. म्हणूनच ताडकन बोलण्याआधी जरा विचार करा..

७) धडधाकट व्हा...
ऐन तारुण्यात आपण स्वत:ला कायम गृहित धरतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं करू नका; व्यायाम करा. व्यायामाने दोन गोष्टी होतात, एक तर आपल्या वेळेचा सदुपयोग आणि दुसरं म्हणजे आपल्या झोपेचा कालावधी कमी होतो. जो काही ताण आपल्या मनावर येतो तो व्यायामाने हलका होतो. या मानसिक ताणाचं काय करायचं याचं तंत्र तुमचं स्वत:लाच शोधावंच लागेल.

८) कॉम्प्रमाईज..? कुठे करायचंच नाही..
महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, तुमच्या मनाच्या खिडक्या कायम जगाच्या दिशेनं उघडच्या ठेवा पण तुमचे पाय मात्र जमिनीवर भक्कम रोवा; त्यांचा तोल जाता कामा नये. आपण नक्की काय आहोत, हे प्रत्येकानं ठरवायलाच पाहिजे. कशाशी तडजोड करणार नाही याचंही भान ठेवायला हवं. ही तत्वच आपल्याला जगवतात. पण तत्व म्हणजे काही नुस्ती बोलण्याची आणि इतरांना सांगण्याची गोष्ट नाही. तुमच्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून तुमची तत्व दिसली पाहिजेत, जगली पाहिजेत. हे करणं मात्र अत्यंत अवघड असतं. कुणीतरी म्हटलंय ना, ' तू काय बोलतो आहेस, हे मला ऐकायला नाही येत कारण तू जे काही करतो आहेस ते इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे, की दुसरं काही सांगायची गरजच नाही.

९) जिकण्यासाठीच खेळा.. पण?
आपण जेव्हा जिकण्यासाठी खेळायला उतरतो तेव्हाच आपल्या सर्व क्षमता पणाला लावतो. जे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे ते ही खेचून आणण्याची ताकद आपल्या क्षमतांना जिकण्याची इच्छाशक्तीच देते. पण खेळताना कायम जिकायलाच हवं हा काही नियम नाही. नाही जिंकलं तर संपलं असंही काही नाही. दुसऱ्याला फसवून जिकणं म्हणजेही काही जिकणं नाही. जिकणं म्हणजे सतत स्वत:ला मैदानात उतरवणं; मागच्यावेळेपेक्षा यावेळी अधिक क्षमतेनं खेळणं, लढणं आणि जिकण्याचा प्रयत्न करणं.

१०) घेणाऱ्याने देत जावे..
आपल्या समाजात आजही विरोधाभासाचं चित्र आपण पाहतोय. सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिक्षणाचं. एकीकडे आपल्याकडे संधी आहेत ज्या गुणी तरुणांची वाट पाहत आहेत. दुसरीकडे मात्र गरीब, उपाशीपोटी माणसं रोजगारासाठी धडपडत आहेत. शिक्षणाच्या सांध्यानेच ही टोकाची खाई कमी करता येईल. सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं तरच गरीबीवर आपण मात करू शकू..
समाजाच्या या प्रक्रियेत आपल्यालाही वाटा उचलावा लागेल, समाजाचं ऋण फेडावं लागेल..!

No comments:

Post a Comment

Vidya Prasarak Mandals College Campus