Library

Tuesday, February 16, 2010

"देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...'

जगात दोन प्रकारचे लोक असतात -
देणारे आणि घेणारे.
घेणाऱ्यांना भले पंचपक्‍वान्नं खायला मिळत असतील,
पण देणाऱ्यांना खात्रीशीर आणि शांत झोप मिळते.
जन्माला आल्यापासून आपण आयुष्य जगत असतो. आपल्याला हवं तसं आयुष्य जगत असतो की जसं समोर येतं तसं आयुष्य जगत असतो हा प्रश्‍न वेगळा. आपले काही प्राधान्यक्रम असतात. काही आवडीने, सहजच आलेले प्राधान्यक्रम; तर काही प्राप्त परिस्थितीत घ्यावे लागलेले प्राधान्यक्रम. आयुष्य जगत असताना हे सारं ठरत असतं, आपण ठरवत असतो.
विंदा करंदीकरांनी लिहून ठेवलंय - "देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...' देणाऱ्याकडून आपण सर्वांत मोठं अन चांगलं काय मिळवू शकतो याचं उत्तर विंदांनी या ओळीत दिलं आहे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजेच देणाऱ्याकडून दातृत्वाचा गुण आपण घ्यावा. कारण देणारा थोर असतो, घेणाऱ्याला तो घडवत असतो. देणारा आणि घेणारा अशा दोन प्रकारच्या लोकांचा उल्लेख वर आला आहे. आपण स्वत:ही कधी देणारा असतो तर कधी घेणारा बनतो. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे अन आयुष्यातील आपले प्राधान्यक्रम कोणते आहेत यावर देणं आणि घेणं याचं महत्त्व अवलंबून असतं. देणारा महत्त्वाचा की घेणारा हे त्यानुसार आपल्याला वाटत असतं.
देणाऱ्याने देत जावे अन घेणाऱ्याने घेत जावे हा व्यावहारिक जगाचा नियमच आहे. मात्र आजच्या जगात देणाऱ्याची नियत आपण घेण्याचा कोणी विचार करत नाही, उलट देणाऱ्याच्या हातातील सारे काही हिसकावून, त्याही पुढे म्हणजे त्याचे हातही ओरबाडून घेण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. या पद्धतीला व्यवस्थापनशास्त्रात "स्पर्धा' असं म्हटलं जातं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अन जिंकण्यासाठी येनकेन प्रकारे दुसऱ्याला दाबून टाकत आपण वर राहिलं पाहिजे असं या आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात शिकवलं जातं. सध्या सर्वत्र असंच चित्र दिसतही असतं. म्हणजे आज कोणालाही देणारा बनायला आवडत नाही, तर घेणारा बनायलाच प्रत्येकाला आवडेल.
देणारा आणि घेणारा यातला खरा फरक ओळखता न आल्यामुळे हे घडत असावं. घेणारा झाल्यानंतर आपण श्रीमंत बनू असं त्यांना वाटतं. कारण हे घेणं विशिष्ट प्रकारचं असतं. प्रत्यक्षात देणारा देता देता सर्वार्थांनी किती श्रीमंत बनतो हे घेणाऱ्याच्या लक्षात येत नाही. कारण देणाऱ्याकडे उलटपावली जे काही येतं त्याची मोजदाद करणं अशक्‍य असतं.
घेणाऱ्याकडे भरपूर संपत्ती असल्याने तो छानछोकीत राहतो, पंचपक्‍वान्नं जेवतो. देणारा तेवढ्या छानछोकीत राहणारा नसेल, कदाचित तो पक्‍वान्नं न जेवेल. पण दिवसअखेर कोण शांतपणे झोपू शकेल हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे. देणारा निर्धास्त असतो, घेणारा तेवढा निर्धास्त असू शकत नाही. आज आपल्या आजूबाजूला आपण हेच बघतो आहोत. काही जणांकडे वर्षागणिक संपत्तीचे इमले चढत गेलेले दिसतात. संपत्तीबरोबर अवतीभवती गाड्या-बंगले उभे राहतात, गोतावळा पसरत जातो. योग्य मार्गाने ही संपत्ती कमावलेली असेल तर ठीक आहे, बहुधा तसं नसतं. त्यामुळे संपत्तीबरोबरच ताण तणाव, अनारोग्य पाचवीला पुजलेले असतात. त्या अनैतिकतेच्या अथवा गैरमार्गांच्या चक्रव्यूहात एकदा अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध नसतो.
याउलट चांगले विचार, शिकवण देणारा समोरच्याला आणि त्याचबरोबर स्वत:लाही दिवसागणिक समृद्ध बनवत असतो. लोकांचे आयुष्य घडवत असतो. देण्यासारखं त्याच्याकडं खूप असतं. श्रीमंतांनाही त्याचा हेवा वाटतो. कारण सारं काही देऊन त्याच्याकडची समृद्धी कमी झालेली नसते, उलट घेणाऱ्याबरोबर देणाराही अधिक श्रीमंत होत गेलेला असतो.
आपल्याकडं काय नाही याचा विचार करून आपण दु:खी बनत असतो. त्याऐवजी आपल्यापाशी काय आहे अन जे आहे त्यातील काय दुसऱ्याला देऊ शकतो याचा विचार केला तर आयुष्यातील दु:ख कमी होईलच. त्याचबरोबर आयुष्य समृद्ध बनेल, आपलं अन दुसऱ्याचंही.

No comments:

Post a Comment

Vidya Prasarak Mandals College Campus