Library

Tuesday, April 20, 2010

कोहा - ग्रंथालयांसाठी मुक्त संकेत संगणक प्रणाली

गेल्या वीस वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळतात. हे बदल मुख्यत: आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप, कार्यपद्धती, सेवासुविधा, वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात महदंतर पडलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ, श्रम, पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते.
तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिमाण बदलतो हे जरी खरे असले तरी काही शाश्वत मूल्ये ही नेहमीच साऱ्या बदलांना आणि तंत्रज्ञानाला दिशादर्शक ठरली आहेत हेही तितकेच सत्य आहे. सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेल्या अशा अनेक मूल्यांपैकी एक म्हणजे समता. गेल्या शतकाचा सारा इतिहास या मूल्याने ढवळून काढला आहे. या मूल्यामुळे विविध क्षेत्रांत अनेक चळवळी उभ्या राहिल्या. सामाजिक विचार मंथनातून हे मूल्य मुख्यत: आर्थिक अंगाने परिष्कृत होत गेले. विविध चळवळीचा आधार बनले.
एकविसाव्या शतकाचा पाया समजल्या जाणाऱ्या संगणकीय तंत्रज्ञानातही एक चळवळ अशीच निर्माण झाली ती म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरची. १९८३ ला ती सुरू झाली ती फ्री सॉफ्टवेअर या नावाने. १९९८ च्या दरम्यान फ्री सॉफ्टवेअरचे नाव बदलून ओपन सोर्स सॉफ्टवेअर ठेवले गेले. त्यामुळे बाजारी अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला. ओपन सोर्स म्हणजे एखादे सॉफ्टवेअर समजून घेऊन कोणीही विकसित करू शकतो. त्यात बदल, सुधारणा करू शकतो आणि अन्य समविचारी लोकांसमवेत ते वापरू शकतो. त्याचा प्रसार करू शकतो. यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही की पैसे मोजावे लागत नाही. याला विरुद्ध अर्थ म्हणजे खासगी मालकी हक्क (कॉपी राइट) असलेली पेटंट मिळवून ती विकून प्रचंड नफा मिळवणारी खासगी सॉफ्टवेअर्स (उदा. मायक्रोसॉफ्ट). ओपन सोर्समध्ये वापराचा परवाना/ संकेत कोड सर्वासाठी खुला असतो. त्यामुळे त्याचा वापर अथवा त्यात सुधारणा कोणीही करू शकतो. त्यावर कोणाचेही र्निबध असत नाहीत. यात जगभरातील समविचारी संगणक तंत्रज्ञ विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारी सॉफ्टवेअर्स सर्वाना खुल्या वापरासाठी उपलब्ध करून देतात. त्यासाठी आपापल्या परीने योगदान देतात आणि तंत्रज्ञानामुळे होणारी आहे रे नाही रे वर्गातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात.
ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात शंकाच नाही. अनेक प्रकारची माहिती, सहस्र नोंदी आणि सुविधा यात एकसूत्रता आणणे सहजशक्य झाले. ग्रंथालयीन सेवक आणि वाचकांचेही श्रम, वेळ आणि पैसा वाचवून सेवा सुविधा तत्परतेने पुरविण्यात हातभार लावला. त्यामुळे बदलत्या काळाच्या आणि वाचकांच्या अपेक्षांना सामोरे जाण्यास ग्रंथालये सज्ज होऊ लागली. मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत विविध खासगी सॉफ्टवेअर्स बाजारात एकामागून एक येऊन त्यांची स्वतंत्र संस्थाने निर्माण झाली. त्यांच्यात जरी स्पर्धा निर्माण झाली तरी या साऱ्यांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे ग्रंथपाल तसेच ग्रंथालये यात संभ्रम निर्माण होऊ लागला. किमतीमध्ये जशी विविधता आणि उंची असे तशी प्रमाणिकरणात मात्र नसे. ग्रंथालयांतील परस्पर सहकार्याच्या मूळ तत्त्वाला बाधा येऊ लागली. फायद्याच्या मागे लागल्याने ग्रंथपाल किंवा ग्रंथालये यांच्या गरजांची पर्वा खासगी कंपन्या करेनाशा झाल्या. नव्या सुधारित आवृत्तीची नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन: पुन्हा खर्च करावे लागले आणि आर्थिक खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक आशेने बघू लागले.
कोहा हे ग्रंथालयांसाठी विकसित केले गेलेले पहिले र्सवकष ओपन सोर्स सॉफ्टवेअर. कोहाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. न्यूझीलंडमधील होरोव्हेनुआ लायब्ररी ट्रस्टसाठी क्याटिपो कम्युनिकेशन कंपनीने विकसित केले. जानेवारी २००० मध्ये ते प्रथम वापरात आले. २००१ मध्ये फ्रान्सच्या पॉल पॉलिनने कोहामध्ये आणखी सोयीसुविधा आणल्या, त्यात मुख्य म्हणजे विविध भाषांचा वापर करण्याची क्षमता. कोहा आता अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे. अगदी चीनी, अरबी आणि जगातील कानाकोपऱ्यातील भाषा आता सहजपणे याचा वापर करीत आहे.
२००५ मध्ये अमेरिकेत कोहा अधिक विकसित करण्यासाठी ओहिओमध्ये लाईबलाईम नावाची कंपनी निर्माण झाली. त्यांनी विकसित केलेल्या झेब्रा सुविधेमुळे कोहामध्ये करोडो पुस्तकांच्या अधिकृत आणि प्रमाणित नोंदी संदर्भासाठी सहज उपलब्ध होऊ लागल्या. अन्य कंपन्यांमध्ये उल्लेख करण्यासारखी नावे म्हणजे कॅलिफोर्नियातील बायवाटर सोल्यूशन आणि मेरिलंडमधील पीटीएफएस इंक. भारतातही बंगलोर आणि मुंबईस्थित न्यूकसॉफ्ट कंपनीची ओएसएस ल्याब्स (osslabs.biz) आघाडीवर आहे. भारतातील विविध भाषांचा वापरही यात आता सहजपणे करता येणे शक्य झाले आहे.
जगभरात हजारांहून अधिक ग्रंथालये कोहाचा वापर करीत आहेत. यात मान्यवर संस्था आहेत. युनेस्कोच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या ग्रंथालयासाठीही कोहाचा वापर अप्रतिम केला आहे. भारतात पाहायचे झाले तर आईआईएम, अहमदाबाद आणि दिल्ली पब्लिक लायब्ररीसारख्या अनेक मातब्बर संस्था कोहाचा वापर त्यांची ग्रंथालये सुसज्ज आणि आधुनिक करण्यासाठी करू लागली आहेत.
कोहाची वैशिष्टय़े
ग्रंथालयासाठी आवश्यक असलेली अधिकात अधिक माहिती संघटन सुविधा कोहामध्ये आढळते. उदा.
१. वाचक आणि ग्रंथालय सेवकांच्या वापरासाठी साधा-सोपा आणि आकर्षक इंटरफेस.
२. माहिती आणि नोंदीचा विविध अंगाने शोध घेण्याची सुविधा.
३. पुस्तके देवघेवीसाठी तसेच वाचक नोंदीसाठी सुविधा.
४. पुस्तकांच्या सविस्तर कॅटलॉग नोंदीसाठी मार्क २१ च्या आधारावर सुविधा.
५. सर्वरमुळे लायब्ररी ऑफ काँग्रेससारख्या मोठय़ा ग्रंथालयाच्या कॅटलॉगमधून अधिकृत नोंदी तयार मिळविता येतात.
६ वाचनसाहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सोय (यात पुस्तक विक्रेते आणि परदेशी चलनाचीही नोंद ठेवली जाते).
७. मोठय़ा ग्रंथालयांसाठी जशी अनेक सुविधांनी युक्त तशीच छोटय़ा ग्रंथालयांसाठी साधीसोपी व्यवस्थाही पुरविली आहे.
८. एखाद्या ग्रंथालयाच्या जर अनेक शाखा असतील (उदा. सार्वजनिक ग्रंथालये) तर त्यांचेही नियंत्रण करण्यासाठी व्यवस्था आहे. उदा. सर्व शाखांतील वाचक, वाचन साहित्य, अंदाजपत्रके, सोयीसुविधा या सर्वावर देखरेख ठेवता येते.
९. मासिके नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे व्यवस्थापन.
१०. वाचकांच्या मागणीचा आढावा घेऊन अहवाल निर्माण करणे आणि अनेक निगडित सुविधा आढळतात.

No comments:

Post a Comment

Vidya Prasarak Mandals College Campus