Library

Tuesday, April 20, 2010

कोहा - ग्रंथालयांसाठी मुक्त संकेत संगणक प्रणाली

गेल्या वीस वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळतात. हे बदल मुख्यत: आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप, कार्यपद्धती, सेवासुविधा, वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात महदंतर पडलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ, श्रम, पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते.
तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिमाण बदलतो हे जरी खरे असले तरी काही शाश्वत मूल्ये ही नेहमीच साऱ्या बदलांना आणि तंत्रज्ञानाला दिशादर्शक ठरली आहेत हेही तितकेच सत्य आहे. सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेल्या अशा अनेक मूल्यांपैकी एक म्हणजे समता. गेल्या शतकाचा सारा इतिहास या मूल्याने ढवळून काढला आहे. या मूल्यामुळे विविध क्षेत्रांत अनेक चळवळी उभ्या राहिल्या. सामाजिक विचार मंथनातून हे मूल्य मुख्यत: आर्थिक अंगाने परिष्कृत होत गेले. विविध चळवळीचा आधार बनले.
एकविसाव्या शतकाचा पाया समजल्या जाणाऱ्या संगणकीय तंत्रज्ञानातही एक चळवळ अशीच निर्माण झाली ती म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरची. १९८३ ला ती सुरू झाली ती फ्री सॉफ्टवेअर या नावाने. १९९८ च्या दरम्यान फ्री सॉफ्टवेअरचे नाव बदलून ओपन सोर्स सॉफ्टवेअर ठेवले गेले. त्यामुळे बाजारी अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला. ओपन सोर्स म्हणजे एखादे सॉफ्टवेअर समजून घेऊन कोणीही विकसित करू शकतो. त्यात बदल, सुधारणा करू शकतो आणि अन्य समविचारी लोकांसमवेत ते वापरू शकतो. त्याचा प्रसार करू शकतो. यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही की पैसे मोजावे लागत नाही. याला विरुद्ध अर्थ म्हणजे खासगी मालकी हक्क (कॉपी राइट) असलेली पेटंट मिळवून ती विकून प्रचंड नफा मिळवणारी खासगी सॉफ्टवेअर्स (उदा. मायक्रोसॉफ्ट). ओपन सोर्समध्ये वापराचा परवाना/ संकेत कोड सर्वासाठी खुला असतो. त्यामुळे त्याचा वापर अथवा त्यात सुधारणा कोणीही करू शकतो. त्यावर कोणाचेही र्निबध असत नाहीत. यात जगभरातील समविचारी संगणक तंत्रज्ञ विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारी सॉफ्टवेअर्स सर्वाना खुल्या वापरासाठी उपलब्ध करून देतात. त्यासाठी आपापल्या परीने योगदान देतात आणि तंत्रज्ञानामुळे होणारी आहे रे नाही रे वर्गातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात.
ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात शंकाच नाही. अनेक प्रकारची माहिती, सहस्र नोंदी आणि सुविधा यात एकसूत्रता आणणे सहजशक्य झाले. ग्रंथालयीन सेवक आणि वाचकांचेही श्रम, वेळ आणि पैसा वाचवून सेवा सुविधा तत्परतेने पुरविण्यात हातभार लावला. त्यामुळे बदलत्या काळाच्या आणि वाचकांच्या अपेक्षांना सामोरे जाण्यास ग्रंथालये सज्ज होऊ लागली. मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत विविध खासगी सॉफ्टवेअर्स बाजारात एकामागून एक येऊन त्यांची स्वतंत्र संस्थाने निर्माण झाली. त्यांच्यात जरी स्पर्धा निर्माण झाली तरी या साऱ्यांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे ग्रंथपाल तसेच ग्रंथालये यात संभ्रम निर्माण होऊ लागला. किमतीमध्ये जशी विविधता आणि उंची असे तशी प्रमाणिकरणात मात्र नसे. ग्रंथालयांतील परस्पर सहकार्याच्या मूळ तत्त्वाला बाधा येऊ लागली. फायद्याच्या मागे लागल्याने ग्रंथपाल किंवा ग्रंथालये यांच्या गरजांची पर्वा खासगी कंपन्या करेनाशा झाल्या. नव्या सुधारित आवृत्तीची नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन: पुन्हा खर्च करावे लागले आणि आर्थिक खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक आशेने बघू लागले.
कोहा हे ग्रंथालयांसाठी विकसित केले गेलेले पहिले र्सवकष ओपन सोर्स सॉफ्टवेअर. कोहाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. न्यूझीलंडमधील होरोव्हेनुआ लायब्ररी ट्रस्टसाठी क्याटिपो कम्युनिकेशन कंपनीने विकसित केले. जानेवारी २००० मध्ये ते प्रथम वापरात आले. २००१ मध्ये फ्रान्सच्या पॉल पॉलिनने कोहामध्ये आणखी सोयीसुविधा आणल्या, त्यात मुख्य म्हणजे विविध भाषांचा वापर करण्याची क्षमता. कोहा आता अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे. अगदी चीनी, अरबी आणि जगातील कानाकोपऱ्यातील भाषा आता सहजपणे याचा वापर करीत आहे.
२००५ मध्ये अमेरिकेत कोहा अधिक विकसित करण्यासाठी ओहिओमध्ये लाईबलाईम नावाची कंपनी निर्माण झाली. त्यांनी विकसित केलेल्या झेब्रा सुविधेमुळे कोहामध्ये करोडो पुस्तकांच्या अधिकृत आणि प्रमाणित नोंदी संदर्भासाठी सहज उपलब्ध होऊ लागल्या. अन्य कंपन्यांमध्ये उल्लेख करण्यासारखी नावे म्हणजे कॅलिफोर्नियातील बायवाटर सोल्यूशन आणि मेरिलंडमधील पीटीएफएस इंक. भारतातही बंगलोर आणि मुंबईस्थित न्यूकसॉफ्ट कंपनीची ओएसएस ल्याब्स (osslabs.biz) आघाडीवर आहे. भारतातील विविध भाषांचा वापरही यात आता सहजपणे करता येणे शक्य झाले आहे.
जगभरात हजारांहून अधिक ग्रंथालये कोहाचा वापर करीत आहेत. यात मान्यवर संस्था आहेत. युनेस्कोच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या ग्रंथालयासाठीही कोहाचा वापर अप्रतिम केला आहे. भारतात पाहायचे झाले तर आईआईएम, अहमदाबाद आणि दिल्ली पब्लिक लायब्ररीसारख्या अनेक मातब्बर संस्था कोहाचा वापर त्यांची ग्रंथालये सुसज्ज आणि आधुनिक करण्यासाठी करू लागली आहेत.
कोहाची वैशिष्टय़े
ग्रंथालयासाठी आवश्यक असलेली अधिकात अधिक माहिती संघटन सुविधा कोहामध्ये आढळते. उदा.
१. वाचक आणि ग्रंथालय सेवकांच्या वापरासाठी साधा-सोपा आणि आकर्षक इंटरफेस.
२. माहिती आणि नोंदीचा विविध अंगाने शोध घेण्याची सुविधा.
३. पुस्तके देवघेवीसाठी तसेच वाचक नोंदीसाठी सुविधा.
४. पुस्तकांच्या सविस्तर कॅटलॉग नोंदीसाठी मार्क २१ च्या आधारावर सुविधा.
५. सर्वरमुळे लायब्ररी ऑफ काँग्रेससारख्या मोठय़ा ग्रंथालयाच्या कॅटलॉगमधून अधिकृत नोंदी तयार मिळविता येतात.
६ वाचनसाहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सोय (यात पुस्तक विक्रेते आणि परदेशी चलनाचीही नोंद ठेवली जाते).
७. मोठय़ा ग्रंथालयांसाठी जशी अनेक सुविधांनी युक्त तशीच छोटय़ा ग्रंथालयांसाठी साधीसोपी व्यवस्थाही पुरविली आहे.
८. एखाद्या ग्रंथालयाच्या जर अनेक शाखा असतील (उदा. सार्वजनिक ग्रंथालये) तर त्यांचेही नियंत्रण करण्यासाठी व्यवस्था आहे. उदा. सर्व शाखांतील वाचक, वाचन साहित्य, अंदाजपत्रके, सोयीसुविधा या सर्वावर देखरेख ठेवता येते.
९. मासिके नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे व्यवस्थापन.
१०. वाचकांच्या मागणीचा आढावा घेऊन अहवाल निर्माण करणे आणि अनेक निगडित सुविधा आढळतात.

मुडल फ्री एलएमएस

आपल्याला चायनीज नुडल्स हा खाण्याचा प्रकार ठाऊक आहे. अर्थात काही लोकांना तो आवडत नाही, हा मुद्दा वेगळा! ई-लर्निगबाबत ‘मुडल’ हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. ते एक जागतिक पातळीवर इंटरनेटवर उपलब्ध असलेलं ओपन कोर्स कॅटेगरीतील एलएमएस आहे, एलएमएस म्हणजे लर्निग मॅनेजमेंट सिस्टीम. ज्याद्वारे ऑनलाइन लर्निग अधिक सुकरपणे शिकवता येते. मुड हे एक साधन आहे. मुडल म्हणजे मॉडय़ुलर ऑब्जेक्ट- ओरिएंटेड डायनॅमिक लर्निग एन्व्हायरोनमेंट (Modular Object- Oriented Dynamic Learning Environment) हा एक मुक्तपणे उपलब्ध असलेला सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. प्राथमिक स्वरूपातील मुडल हे ऑस्ट्रेलियातील पर्थ इथे डेव्हलप झाले आणि नंतर ते आजच्या स्वरूपात विकसित झाले आजच्या घडीलाही मुडल विकसित होत आहे.
शिक्षण क्षेत्राला उपयोग व्हावा म्हणून मुडल हे एक साधन वापरले जाते. आजवर ४५,७२१ नोंदणीकृत युझर्स आहेत आणि ३ मिलियन्स कोर्सेससाठी ३२ मिलियन्स युझर्स असल्याची जानेवारी २०१० पर्यंतची आकडेवारी उपलब्ध आहे. मुडलमधील विविध प्रकारच्या ठळक वैशिष्टय़ांकडे पाहूया-
प्लॅन इन पद्धतीचे काही प्रकार
अ‍ॅक्टिव्हिटीज - ज्यात शब्दांचे प्रकार, गणितातील गमती वगैरे करता येतात.
प्रश्नोत्तर - आज सर्वत्र एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे परीक्षा पद्धतीमध्ये वापरले जातात. तसे प्रश्न किंवा गाळलेल्या जागा भरा. खरं-खोटं सांगा, जोडय़ा लावा अशा प्रकारची प्रश्नोत्तरे आपल्याला मुडल पॅटर्नमध्ये तयार करता येतात.
ग्राफिकल थीम्स - विविध प्रकारच्या ग्राफिकल थीम्स, विषयांची हाताळणी करता येते.
एनरोलमेंट - यासाठी सुद्धा उपयोग होतो.
कन्टेन्ट फिल्टर्स - विविध तऱ्हेचे फिल्टर्स म्हणजेच चाळण्या बसवणं. आपल्या कन्टेन्टमध्ये अशा गाळण्या बसवता येतात.
मुडल बसविण्यासाठी एक तर थेट म्हणजे मूळ सोर्सकडून घेता येते किंवा डेबी यन पॅकेज किंवा बीटनामी इन्स्टॉलर बसवूनही वापरता येते. शिवाय काही मोफत होस्टिंग प्रोव्हायडर्स असतात.
युनिक्स, लायनक्स फ्री बीएसडी, विण्डोज, मॅक ओएस एक्स, नेटवेअर आणि पीएचपी किंवा तत्सम अन्य सिस्टीम्स ज्या बहुतांशी बेवहोस्ट प्रोव्हायडर्स उपलब्ध करतात, त्यावर मुडल सहजपणे चालवता येते.
मुडलचा वैश्विक पसारा - खालील आकडेवारीतून आपल्याला मुडलच्या ग्लोबल पसाऱ्याची कल्पना येऊ शकते. (हे आकडे ९ जानेवारी २०१० चे आहेत.)
० ४६६२४ रजिस्टर्ड साइटस.
० ३२४६४९९२ युझर्स
० ३१६१२९१ कोर्सेस
० २०९ देशांत ७५ भाषांतून उपलब्ध.
० ब्रिटनमधील रॉबर्ट गॉर्डन युनिव्हर्सिटीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम मुडल प्रणाली वापरली. तसंच केंट विद्यापीठाने संपूर्ण कॅम्पसाठी मुडल वापरले.
तांत्रिक वैशिष्टय़े - १९९९ पासून मुडलमध्ये नवनवीन स्थित्यंतरे होत आहेत. सध्या १.९७ जे नोव्हेंबर २००९ मध्ये जागतिक पातळीवर उपलब्ध करण्यात आले. ८० विविध भाषांतून आणि नजीकच्या भविष्यकाळात मुडल २.० व्हर्शनसही तयार होईल असा अंदाज आहे.
मुडलच्या सुलभ प्रसाराची कारणे - आज जगाच्या कानाकोपऱ्यात विविध शिक्षण संस्था वा विद्यापीठे यांना मुडल हवेहवेसे वाटते. त्याची कारणे खालीलप्रमाणे :-
१) मुडलला लायसन्स फी नाही. बिना परवाना ते सहजगत्या डाऊनलोड करून घेता येते.
२) मुडल सव्‍‌र्हर्सवर र्निबध नाहीत. एखादी संस्था हवे तितक्या प्रमाणात मुडल युझर्स वाढवू शकते. ब्रिटनमधील एका मुक्त विद्यापीठाने एकाच वेळी २ लाख युझर्स निर्माण केले आहेत.
३) मुडलची सातत्याने डेव्हलपमेंट होत असते. सुधारणा करण्यासाठी केलेल्या सूचना शिफारसीच्या आधारे असे बदल घडत असतात. ही लवचिकता, अद्ययावतता महत्त्वाची.
४) युझर्स मुफ्त स्वरूपात वापरू शकतात. वितरण करू शकतात.
काही समानार्थी प्लॅटफॉम्र्स - ब्लॅकबोर्ड, हॉटचॉक, ओएल-एटी मेटॅकून, इ-फॉन्ट, ए-टय़ुटर, सीसी नेट इ.

Thursday, April 8, 2010

ढजझ १०

परीक्षा आणि निकालांचे हे दिवस..
भविष्यात कुठलं करिअर निवडायचं
या विचारात सध्या अनेकजण असतील.
काहीजण नोकरीत आलेला 'तोच तो' पण
कसा घालवायचा आणि कसं जिदादिलीनं
जगायचं आयुष्य म्हणून झगडत असतील..
ठरवायचं म्हटलं तरी काही ठरवताच
येत नाही असंही वाटत असेल कुणाकुणाला..
मनातल्या अशाच काही प्रश्नांची उकल
कशी शोधायची हे सांगणाऱ्या काही
प्रेरणादायी गोष्टी..
प्रेरणेचं बी मनामनात रुजवणारी
आणि जगण्याला दिशा देणारी ही
विचारसूत्रे. विप्रोचे संस्थापक
अझिम प्रेमजी यांनी आयआयटी
दिल्लीच्या पदवीदान सोहळ्यात
केलेल्या भाषणाचा संपादित संक्षिप्त
अनुवाद..


जगण्याची एक गंम्मत असते..
एखादी गोष्ट हातून निसटायला लागली की आपल्याला तिची कदर वाटू लागते. माझे केस काळ्याचे पांढरे झाले आणि मग पांढरे केसही उडून गेले तेव्हा कुठे तारुण्यातला जोष आणि उत्साह ही किती महत्वाची गोष्ट असते हे मला जाणवायला लागलं. जगण्याच्या या प्रवासाने जे धडे शिकवले त्याचीही कदर याच वळणावर वाटू लागली. माझ्या अनुभवातून जे मी कमावलं ते कदाचित तुम्हाला करिअरची सुरुवात करताना थोडंफार उपयोगी पडावं..
मी करिअर सुरू केलं तेव्हाचं जग आणि आजचं जग यात प्रचंड अंतर आहे. साठीच्या दशकातला भारत दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीवर जगत होता; अन्नधान्यासारख्या अत्यंत मूलभूत गरजाही भागवणं मुश्किल होतं. परदेशी गेलं की लोक आपल्याकडे दयाभावनेनं पहायचे. पण आता काळ बदललाय; पुर्वी जेव्हा विदेशी माणसं भारतात यायची तेव्हा या देशासाठी आपल्याला काय मदत देता येऊ शकेल असा विचार करत यायची; पण आता ते विचार करतात की भारत आपल्याला काय मदत करू शकेल..!
एक अत्यंत आशावादी भारतीय म्हणून देशाची ही प्रगती पाहताना मला नेहमी वाटतं की परंपरा-संस्कृती म्हणून आपला देश समृद्ध आहेच; पण आता धर्मनिरपेक्ष-प्रभावी लोकशाहीच्या माध्यमातून आपण उत्तम समाजही घडवू शकतो.
मात्र त्यासाठी तुम्हाला या देशाची सूत्रं आपल्या हातात घ्यावी लागतील...

१) टेक चार्ज
चार दशकांपुर्वी मी अमळनेरच्या विप्रो फॅक्टरीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. फक्त २१ वर्षांचा होतो. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंग स्कुलमधे काही वर्षे अभ्यास करुन परतलो होतो. खूप लोकांनी मला सल्ला दिला की भरभक्कम पगाराची नोकरी शोध कशाला उगीच तेलाच्या धंद्यात पडतोस ? आज मागे वळून पाहताना वाटतं की नशिब मी तो सल्ला मानला नाही आणि तो तेल उद्योग हातात घेतला. मला वाटतं आपण काय करायला हवं हे आपलाच आतला आवाज आपल्याला सतत सांगत असतो. कितीही सैरभैर वाटलं, निर्णय घेणं मुश्किल असलं तरी नेमकं काय करायला हवं हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. तुम्ही ऐकला तो आवाज, ऐकलं स्वत:च्या मनाचं तर तुमचा स्वत:वर भरवसा आहे असं समजा..
आणि करिअर निवडण्याची; आपले मार्ग शोधण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा स्वत:चे निर्णय स्वत:च्या हातात घ्या..

२) कमाई कसली? - आनंदाची?
कष्टानं कमावलेल्या एका रूपयाची किम्मत ही सापडलेल्या पाच रूपयांपेक्षा जास्त असते. जे चटकन येतं ते चटकन निघूनही जातं हा जुना नियम तुम्हाला माहितीच आहे. आपण जे कष्टानं कमावतो त्याचं मोल आपल्यालाच कळतं. त्यामुळे कष्टातून होणाऱ्या आनंदाची कमाई स्वत:ची स्वत: करा..!

३) अपयश चालेल.. यशाचा धोका..!
प्रत्येकवेळी प्रत्येक सामन्यात शतक ठोकणं कुणालाच जमत नाही. आयुष्याच्या वाटेवर कितीतरी आव्हानं असतात, त्यांना भिडलं की काहींवर आपण मात करतो काही आपल्यावर. आपलं जिंकणं आपल्याला मनापासून साजरं करता यायलाच हवं. पण जिकण्याची नशा डोक्यात गेली की त्याक्षणी हारण्याच्या घसरगुंडीवर आपण चढलेलो असतो, तेवढं टाळता आलं पाहिजे. पण नेहमीच यश कसं येईल अपयशही येतंच वाट्याला, यशपयाशाच्याच चक्राचा भाग म्हणून ते स्वीकारा आणि पुढे चला. फक्त विसरु नका तो त्या अपयशाने शिकवलेला धडा.

४) आत्मविश्वास आणि उद्धटपणा..
आत्मविश्वास आणि उद्धटपणा अगदी पातळ अदृश्य रेषा असते. फरक असतो तो एवढाच की ज्या लोकांकडे दांडगा आत्मविश्वास असतो ते नवनव्या गोष्टी शिकायला सतत तयार असतात. अलिकडेच युरोपात एक सर्वेक्षण करण्यात आलं..ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांच्या अंगी सगळ्यात मोठी कुठली क्षमता हवी असेल तर ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीतून नवनवे धडे सतत शिकण्याची. याउलट जी माणसं उध्दट असतात त्यांचं शिक्षण कधीच थांबलेलं असतं. आपल्याला सगळं येतं, आपल्याला सगळं माहिती आहे, कुणी काही सांगण्याची, नवं काही शिकण्याची काहीच गरज नाही असं त्यांना वाटू लागतं.

५) भूक.. नव्या मार्गाची..!
एखादी गोष्ट आपल्याला खूप चांगली जमते, उत्तम करता येते पण त्याचा अर्थ असा नाही की ती करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो. आपण करतो त्यापेक्षाही उत्तमरीतीने ते काम करता येऊ शकतं, त्याहूनही उत्कृष्ट काम आपल्या हातून घडू शकतं हे लक्षात ठेवा. परिपूर्णता हे काही यशाचं शिखर नव्हे तर यशापर्यंत पोहचण्याचा तो अखंड चालणार प्रवास आहे. कल्पकता आणि सृजनशिलतेला प्रेरणेची आणि शिस्तीची कायम गरज असते. कल्पकता आणि उत्तमतेचा ध्यास या दोन गोष्टींना पर्याय नाही.

६) रिअॅक्ट करू नका; प्रतिसाद द्या..
मतभेद असतातच. यश-अपयशाच्या टप्यातचही द्विधा असतेच मनाची. मग दोन स्वतंत्र व्यक्तींमधेही मतभेद असणं अस्वाभाविक नाही. पण प्रतिक्रिया देणं आणि प्रतिसाद देणं यात फरक असतो..! आपण प्रतिसाद देतो तेव्हा शांतपणे विचार करतो, जे योग्य आहे ते विचारपूर्वक सांगतो. आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण असतं. पण आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपलं आपल्यावर नियंत्रण नसतं. जे समोरच्याला अपेक्षित आहे किवा जे आपल्यालाही अपेक्षित नसतं तेच आपण बोलतो. म्हणूनच ताडकन बोलण्याआधी जरा विचार करा..

७) धडधाकट व्हा...
ऐन तारुण्यात आपण स्वत:ला कायम गृहित धरतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण तसं करू नका; व्यायाम करा. व्यायामाने दोन गोष्टी होतात, एक तर आपल्या वेळेचा सदुपयोग आणि दुसरं म्हणजे आपल्या झोपेचा कालावधी कमी होतो. जो काही ताण आपल्या मनावर येतो तो व्यायामाने हलका होतो. या मानसिक ताणाचं काय करायचं याचं तंत्र तुमचं स्वत:लाच शोधावंच लागेल.

८) कॉम्प्रमाईज..? कुठे करायचंच नाही..
महात्मा गांधी नेहमी म्हणायचे, तुमच्या मनाच्या खिडक्या कायम जगाच्या दिशेनं उघडच्या ठेवा पण तुमचे पाय मात्र जमिनीवर भक्कम रोवा; त्यांचा तोल जाता कामा नये. आपण नक्की काय आहोत, हे प्रत्येकानं ठरवायलाच पाहिजे. कशाशी तडजोड करणार नाही याचंही भान ठेवायला हवं. ही तत्वच आपल्याला जगवतात. पण तत्व म्हणजे काही नुस्ती बोलण्याची आणि इतरांना सांगण्याची गोष्ट नाही. तुमच्या अनेक छोट्या छोट्या कृतीतून तुमची तत्व दिसली पाहिजेत, जगली पाहिजेत. हे करणं मात्र अत्यंत अवघड असतं. कुणीतरी म्हटलंय ना, ' तू काय बोलतो आहेस, हे मला ऐकायला नाही येत कारण तू जे काही करतो आहेस ते इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे, की दुसरं काही सांगायची गरजच नाही.

९) जिकण्यासाठीच खेळा.. पण?
आपण जेव्हा जिकण्यासाठी खेळायला उतरतो तेव्हाच आपल्या सर्व क्षमता पणाला लावतो. जे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे ते ही खेचून आणण्याची ताकद आपल्या क्षमतांना जिकण्याची इच्छाशक्तीच देते. पण खेळताना कायम जिकायलाच हवं हा काही नियम नाही. नाही जिंकलं तर संपलं असंही काही नाही. दुसऱ्याला फसवून जिकणं म्हणजेही काही जिकणं नाही. जिकणं म्हणजे सतत स्वत:ला मैदानात उतरवणं; मागच्यावेळेपेक्षा यावेळी अधिक क्षमतेनं खेळणं, लढणं आणि जिकण्याचा प्रयत्न करणं.

१०) घेणाऱ्याने देत जावे..
आपल्या समाजात आजही विरोधाभासाचं चित्र आपण पाहतोय. सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिक्षणाचं. एकीकडे आपल्याकडे संधी आहेत ज्या गुणी तरुणांची वाट पाहत आहेत. दुसरीकडे मात्र गरीब, उपाशीपोटी माणसं रोजगारासाठी धडपडत आहेत. शिक्षणाच्या सांध्यानेच ही टोकाची खाई कमी करता येईल. सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं तरच गरीबीवर आपण मात करू शकू..
समाजाच्या या प्रक्रियेत आपल्यालाही वाटा उचलावा लागेल, समाजाचं ऋण फेडावं लागेल..!

Vidya Prasarak Mandals College Campus