संशोधनात्मक ग्रंथालये : काळाची गरज
वा. दा. म्हापसेकर , रविवार १९ सप्टेंबर २०१०.
mvasudeo@rediffmail.com
संशोधनात्मक ग्रंथालय हे केवळ ग्रंथांचा संग्रह करणारी वास्तू नसून ते एक ज्ञानाचा एक जिवंत झरा (Virtual Spring of the Knowledge) असते. संशोधनात्मक ग्रंथालय म्हणजे माहितीचा प्रवास, तिच्या मूळ स्रोतापासून अंतिम उपयोगकर्त्यांपर्यंत त्वरेने आणि सहजगत्या होण्याकरिता कार्यरत असलेली एक सक्षम आणि सुसज्ज अशी ज्ञान यंत्रणा होय.
संशोधन म्हणजे काय?
जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड इंग्रजी शब्दकोशाने संशोधनाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे- 'Research is an investigation directed to the discovery of some facts by careful study of a subject.' 1
‘संशोधन’ म्हणजे एखाद्या विषयाचा काळजीपूर्वक अन्वेषणात्मक अभ्यास करून सत्याचा मागोवा घेणे होय. दुसऱ्या एका व्याख्येनुसार एखाद्या विषयाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने चिकित्सक आणि विश्लेषणात्मक अभ्यास करून सत्य स्वरूपाचे दर्शन घडविणे किंवा त्यावरून निश्चित स्वरूपाची तत्त्वे विशद करणे या प्रक्रियेला ‘संशोधन’ असे म्हणतात.
'Research is a careful investigation or inquiry specially through search for new facts in any branch of knowledge.' 2
परिचयात्मक (Explorative), वर्णनात्मक (Descriptive), निदानात्मक (Diagnostic) आणि प्रायोगिक (Experimentive) असे संशोधनाचे चार प्रधान हेतू सांगितले जातात. तर मूलभूत (Fundamental/ Pure/ Basic), उपयोजित (Applied) आणि क्रियात्मक (Action) हे संशोधनाचे तीन मुख्य व्यवहारोपयोगी प्रकार मानले गेले आहेत.
कोणत्याही देशाच्या प्रगतीची गती ही त्या देशातील शिक्षणप्रणाली आणि संशोधन कार्यक्रमांच्या विकासाच्या गतीवर अवलंबून असते. संशोधन हे एक सुसंघटित स्वरूपाचे पद्धतशीररीत्या करावयाचे अभ्यासकार्य असून नवनिर्मितीचे एक महत्त्वाचे साधन आहे.
आज जगभर संशोधन कार्यक्रमांची, संशोधकांची आणि संशोधन संस्थांची संख्या निरंतर वाढत असून त्यासाठी प्रत्येक देशाचे शासन अधिकाधिक निधी उपलब्ध करवून देत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसारखे काही खाजगी उद्योगसमूहही या बाबतीत अग्रेसर असून त्यांनी स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन केल्या आहेत. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी डॉ. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या नॅशनल नॉलेज कमिशनने आपल्या अहवालात संशोधनाचे आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व विशद करून, अशा सेवा आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची शिफारस केली आहे. सेवांचे आधुनिकीकरण, खाजगी उद्योगसमूहांशी भागीदारी, ग्रंथालयांच्या विकासासाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची स्थापना, व्यावसायिक सल्ला-सेवा आणि माहिती व ज्ञानसाधनांच्या आदान-प्रदानासाठी देशामध्ये विविध ठिकाणच्या ज्ञानसंस्थांना जोडणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक डिजिटल ब्रॉडबँड आणि गीगाबीट क्षमतेच्या National Knowledge Network ची स्थापना वगैरे काही महत्त्वपूर्ण सूचना या आयोगाने केंद्र सरकारला केल्या आहेत. ३
भारतामध्ये CSIR, ICMR, UGC सारख्या संस्थांमार्फत केंद्र शासन संशोधनासाठी विविध संस्थांना निधी आणि इतर सोयी उपलब्ध करवून देते. WHO, UNESCO, UNICEF, WORLD BANK आदी आंतरराष्ट्रीय संस्थादेखील या कार्यामध्ये आपले आर्थिक, तांत्रिक व इतर योगदान नियमितपणे देत असतात. मुंबईमधील हाफकिन संशोधन संस्था, TIFR (टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्था), BARC (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र), TISS (टाटा सामाजिक विज्ञान संस्था), IIPS (आंतरराष्ट्रीय जन-विज्ञान संशोधन संस्था), आय. आय. टी. ही संशोधन संस्थांची काही ठळक उदाहरणे! संशोधन संस्थांशिवाय महाविद्यालये आणि विद्यापीठांमधूनसुद्धा संशोधनावर आधारित अभ्यासक्रमांवर भर दिला जात असून अशा संशोधन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निरंतर वाढतच आहे.
संशोधनात्मक ग्रंथालय :
ग्रंथालय म्हणजे काय?
वाचकांच्या उपयोगाकरता एखाद्या शास्त्रशुद्ध वर्गीकरण पद्धतीनुसार वर्गीकृत केलेला आणि एखाद्या मान्यवर तालिकासंहितेनुसार तालिकाबद्ध केलेला ग्रंथ आणि ग्रंथेतर ज्ञानसाधनांचा संग्रह म्हणजे ग्रंथालय होय. आज जगाच्या उंबरठय़ावर नव्याने उभ्या ठाकलेल्या कागदरहित युगात (Paperless Society) तर डिजिटल ग्रंथालय, ई-ग्रंथालय आणि व्हच्र्युअल ग्रंथालय या संकल्पनांची जोड पारंपरिक ग्रंथालयांना देणे अत्यावश्यक झाले आहे. सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, राष्ट्रीय ग्रंथालय आदी ग्रंथालयांचे विविध प्रकार असून संशोधनात्मक ग्रंथालय हे एक विशेष स्वरूपाचे ग्रंथालय मानले जाते.
संशोधनात्मक ग्रंथालय म्हणजे काय?
संशोधनात्मक ग्रंथालयांची व्याख्या Special Libraries Assocation ने पुढीलप्रमाणे केली आहे- 'Special Library is an organisation that provides focused, working information to a special clientele on an ongoing basis to further the mission and goals of the parent company/ organisation.' 4
संशोधनात्मक ग्रंथालये ही एखाद्या संशोधन, शैक्षणिक, औद्योगिक किंवा व्यापारी संस्थेला संलग्न राहून, त्या संस्थेच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असतात. संशोधन संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ हे येथील माहितीचे उपयोगकर्ते आणि निर्माते असतात. त्यांच्या विशिष्ट स्वरूपाच्या ज्ञान-गरजा ध्यानी ठेवून संशोधनात्मक ग्रंथालयांच्या सेवांची योजना, आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. विशिष्ट विषयामध्ये स्वत:ला अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक संशोधकाचे आद्यकर्तव्य असून त्यामुळे त्याला स्वत:ला जगाबरोबर ठेवता येते. शिवाय त्यामुळे प्रयोगशील राहता येते, संशोधनाच्या नवीन संकल्पना सुचतात.
संशोधनात्मक ग्रंथालयांतील सेवा आणि कामांची आखणी ही प्राधान्याने संशोधकांच्या पुढील स्वरूपाच्या गरजांवर आधारलेली असते.
१. विशिष्ट विषयांवर आजपर्यंत जगामध्ये ज्ञानाची अत्युच्च पातळी ज्या स्तरापर्यंत गाठली गेली आहे त्या स्तराचा अंदाज बांधणे.
२. विशिष्ट विषयांवर उपलब्ध ज्ञानामध्ये असलेल्या उणिवा, कमतरता आणि दोष शोधणे, यामधूनसुद्धा संशोधनासाठी एखादा नवा विषय सापडू शकतो.
३. संशोधनासाठी आपण निवडलेल्या विशिष्ट विषयावर आतापर्यंत इतर कोणीही संशोधन केले नसल्याची खात्री करणे.
४. आपण संशोधनासाठी निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने जगभरात चाललेल्या नव्या संशोधनांची, घटनांची आणि ताज्या घडामोडींची निरंतर दखल घेत राहणे.
५. प्रत्यक्ष संशोधन कार्य सुरू असताना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेली, जगभरातील अत्याधुनिक व अद्ययावत माहिती विविध ज्ञानसाधनांद्वारे नियमितपणे संकलित करणे.
संशोधनात्मक ग्रंथालयांमधील ज्ञान साधने :
मानव्य विद्या, समाज शास्त्रे, विज्ञान तंत्रज्ञान, कायदा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये जगभर संशोधनाच्या माध्यमातून इतक्या प्रचंड प्रमाणात माहितीचा ओघ वाढतो आहे की, या ज्ञान-संचयाचे वर्णन ‘माहितीचा परिस्फोट’ (Information Explosion) अशा शब्दांत केले जाते. जगभर विविध माध्यमांमधून या ज्ञानरूपी माहितीचे नियमितपणे संकलन व प्रसारण होत असते. या माध्यमांचे प्राथमिक प्रलेख, द्वितीयक प्रलेख आणि तृतीयक प्रलेख (Primary, Secondary and Tertiary /Sources of Information) असे ढोबळमानाने वर्गीकरण करता येते.
प्राथमिक प्रलेखांमध्ये हस्तलिखिते, पत्रव्यवहार, अहवाल, शासकीय प्रकाशने, नियतकालिकांतील लेख, शोधनिबंध, प्रबंधिका, प्रबंध, मोनोग्राफ्स, स्टँडर्डस्, पेटेटन्स आदी साहित्याचा समावेश होतो. यामधील माहिती ही First Hand Information असून संशोधनास अतिशय आवश्यक अशी असते. द्वितीयक आणि तृतीयक प्रलेख हे प्राथमिक प्रलेखांतील माहितीच्या आधारे निर्माण होत असतात. विविध स्वरूपात विखुरलेल्या प्राथमिक प्रलेखातील माहिती संशोधकाला सहजगत्या संकलित करता यावी हा द्वितीयक आणि तृतीयक प्रलेखामागील मूळ हेतू असतो. उदा. ‘महाराष्ट्रातील सतीची चाल’ या विषयावर कोणाला संशोधन करावयाचे असेल तर त्याला ब्रिटिशकालीन वृत्तपत्रे, नियतकालिकांतील लेख, ब्रिटिश सरकारचा पत्रव्यवहार, न्यायालयीन कागदपत्रे, शासकीय नोंदी, सरकारी गॅझेटच्या प्रती, तसेच या विषयावरील पुस्तके आदी प्राथमिक प्रलेखांचा विस्तृत अभ्यास करावा लागेल आणि ‘सती’ या विषयावरील अशा सर्व साहित्याची जर एकत्रित यादी (ग्रंथसूची Bibliography) उपलब्ध होऊ शकली तर त्या संशोधकाला ती एक पर्वणीच ठरेल. कारण त्यामुळे त्याला आपले संशोधन कार्य नव्या जोमाने चालू करता येईल. अन्यथा अंधारात चाचपडत बसावे लागेल. अशा ग्रंथसूचीच्या आधारे त्याला उपरोक्त विविध स्वरूपाचे प्राथमिक प्रलेख मिळविता येऊ शकतील. ग्रंथसूची किंवा निर्देश व लेखांश याद्या देणारी नियतकालिके ही द्वितीयक प्रलेखांची उदाहरणे आहेत. वरील स्वरूपाचे प्राथमिक किंवा द्वितीयक प्रलेख कोणत्या ग्रंथालयांत उपलब्ध होऊ शकतील हे सांगणारे प्रलेख. उदा. सांघिक तालिका म्हणजे तृतीयक प्रलेख होतो. प्राथमिक आणि द्वितीयक प्रलेखांच्या आधारे त्यांच्यामधील माहितीची फेररचना करून निर्माण केलेले साहित्य म्हणजे तृतीयक प्रलेख होय. सूचीची सूची, निर्देशिका, पाठय़पुस्तके ही तृतीयक प्रलेखांची इतर काही उदाहरणे आहेत.
आपल्या संस्थेमध्ये ज्या विषयांवर संशोधन चालते ते विशिष्ट विषय आणि त्यांच्या उपविषयांवरील ज्ञान साधनांचा येथे एक बहुआयामी ज्ञान खजिनाच उपलब्ध असतो. उदा. अणुशक्तीशी निगडित विषयावरील साहित्य BARC च्या ग्रंथालयात बहुसंख्येने पाहावयास मिळते तर संसर्गजन्य रोग आणि तद्नुषंगिक विषयावरील अद्ययावत ज्ञान साधने हाफकिन संशोधन संस्थेच्या ग्रंथालयात उपलब्ध करून दिली जातात. अशा ग्रंथालयातील ज्ञान साहित्य तीन गटांत विभागता येते. सर्वसाधारण साहित्य, विशेष साहित्य आणि संदर्भ साहित्य. सर्वसाधारण ज्ञान साहित्यामध्ये ग्रंथ, पाठय़पुस्तके, नियतकालिके, शास्त्रीय माला प्रकाशने (Series) अहवाल, सरकारी प्रकाशने आदींचा समावेश असतो, तर विशेष साहित्यामध्ये दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, प्रबंध (Thesis), प्रबंधिका (Dissertation), प्राचीन दस्ताऐवज (Archives), नाणी, शिलालेख, ताम्रपटादी कोरीव मजकूर, चित्रे, नकाशे, छायाचित्रे, रेकॉर्डस्, कॅसेटस्, सिडीज, डिव्हीडीज, फिल्म्स, मायक्रोफिल्म्स, मायक्रोफिश, तसेच परिपत्रके, पुनमुर्दिते (Reprints) आदी साहित्याचा समावेश असतो. आजकाल इंटरनेटवरील ऑनलाइन ज्ञान साधनांचाही मोठय़ा संख्येने समावेश केला जातो. संशोधनात्मक ग्रंथालयात ग्रंथांच्या तुलनेत नियतकालिके, ई-बुक्स, ई-जर्नल्स आणि विविध डेटाबेसेसवर अधिक खर्च केला जातो.
संदर्भ साहित्यात विविध संदर्भ-ग्रंथ तसेच दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, मौल्यवान साहित्य आदींचा समावेश असतो. संदर्भ-ग्रंथ विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी वारंवार मागितले जातात. संदर्भ-ग्रंथ सर्वसाधारण ग्रंथापेक्षा भिन्न स्वरूपाचे असून यांच्यामधील माहितीची रचना विशिष्ट माहिती त्वरित शोधता यावी या दृष्टिकोनातून विशिष्ट पद्धतीने केलेली असते. उदा. शब्दकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश, वार्षिके, पंचांगे, स्थळवर्णन, कोश (Gazetteers), नकाशा संग्रह, ग्रंथसूची (Bibliographies), निर्देश व लेखांश याद्या देणारी नियतकालिके (Indexing & Abstracting Journals), आदींमधील माहितीची रचना ही विशिष्ट पद्धतीने केलेली आढळेल. संदर्भ संग्रहातील साहित्य घरी वाचण्यासाठी दिले जात नाही. ते ग्रंथालयांतच बसून वाचावे अशी अपेक्षा असते. सर्वसाधारण संग्रहातील साहित्य मात्र वाचनासाठी घरी नेता येते.
सेवक वर्ग :
उपलब्ध ज्ञानसंग्रह आणि संशोधक यांना एकत्र आणण्याचे कौशल्यपूर्ण कार्य येथील ग्रंथपाल वर्ग करीत असतो. ज्ञानसंग्रहाची उपयुक्तता आणि उपयोग वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. विशिष्ट विषय आणि त्याच्या उपशाखांशी निगडित साहित्य संकलित करणे, त्यांचे योग्य प्रकारे वर्गीकरण, तालिकीकरण करून ते उपयोगासाठी सिद्ध करणे, साहित्याचे जतन करणे, तसेच संशोधकांसाठी अद्ययावत माहिती- सेवा (Current Awarness Service), निवडक- माहिती प्रसारण (Selective Dissemination of Information), प्रलेख आदान-प्रदान सेवा, निर्देश आणि लेखांश सेवा, संदर्भ सेवा, अनुवाद सेवा, प्रतिलिपी सेवा अशा विशेष सेवांचे आयोजन येथे केले जाते.
साहित्याचे वर्गीकरण :
संशोधनात्मक ग्रंथालयांमधील ज्ञान साहित्याचे वर्गीकरण हा एक स्वतंत्र संशोधनाचाच भाग आहे आणि त्यामुळे आपल्या संशोधकांच्या ज्ञान गरजांचा अभ्यास करून योग्य अशी वर्गीकरण पद्धती विकसित करण्याकरिता आजकाल काही संशोधनात्मक संस्थांच्या ग्रंथालयांमध्ये रिसर्च फेलोज् नेमले जात आहेत. संशोधनात्मक ग्रंथालयात संशोधकांच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म आणि सखोल वर्गीकरण करणे आवश्यक असते. विश्लेषणात्मक वर्गीकरणाद्वारे एरवी दुर्लक्षिली जाऊ शकणारी ग्रंथांमधील महत्त्वपूर्ण प्रकरणे संशोधकांच्या नजरेस आणता येतात. नव्या विषयांचा समावेश करता येण्यासाठी वर्गीकरण पद्धतीमध्ये योग्य समावेशक चिन्हांकनाची सोय असणेदेखील महत्त्वाचे आहे. शास्त्रीय संशोधनामध्ये जे महत्त्व प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष प्रयोगाला असते, तितकेच महत्त्व संशोधनात्मक ग्रंथालयामध्ये वर्गीकरणाला असते.
साहित्याचे तालिकीकरण :
ग्रंथालयातील वाचन-साहित्याची एखाद्या शास्त्रशुद्ध तालिका संहितेनुसार वाचकांच्या उपयोगाकरिता बनविलेली यादी म्हणजे तालिका होय. तालिका बनविण्याचे प्रत्यक्ष कार्य म्हणजे तालिकीकरण. संशोधनात्मक ग्रंथालयांमध्ये वर्गीकरणाप्रमाणे तालिकीकरणदेखील सूक्ष्म आणि सखोल पद्धतीने केले जाते. काही ग्रंथांना लाभलेल्या वैशिष्टय़पूर्ण प्रस्तावनांची दखलदेखील तालिकेमध्ये घेता येते. वर्गीकरणाची एक मर्यादा म्हणजे एखाद्या ग्रंथात दोन किंवा अधिक विषय चर्चिले गेले असले, तरीसुद्धा तो एकाच विषयाच्या ठिकाणी ठेवावा लागतो. मात्र विश्लेषणात्मक तालिकीकरण यावर उत्तम तोडगा देऊ शकते. विविध कालिकांतील महत्त्वाचे लेखही अशा विश्लेषणात्मक नोंदींच्या साहाय्याने संशोधकांच्या नजरेस आणता येतात.
नियतकालिकांतून नेहमी ताजी आणि अद्ययावत माहिती प्रसारित होत असल्याने संशोधनात्मक ग्रंथालयांमध्ये नियतकालिके मोठय़ा संख्येने घेतली जातात. १९६५ साली प्रकाशित झालेले Philosophical Transactions of the Royal Society हे जगातील पहिले शास्त्रीय नियतकालिक मानले जाते. या ग्रंथालयांमध्ये निर्देश आणि लेखांश- याद्या देणाऱ्या नियतकालिकांचे विशेष महत्त्व असून संशोधकांना त्यांच्या विषयामध्ये अद्ययावत ठेवण्याचे कार्य ती करतात. या कालिकांमध्ये विशिष्ट विषयावर विविध देशांमध्ये विविध भाषांतून प्रसिद्ध होणाऱ्या प्रलेखांचा नियमितपणे आढावा घेतला जातो. या आढाव्यामध्ये प्रत्येक लेखाचा सारांश तसेच मूळ पूर्ण लेख कोणत्या नियतकालिकात, कोणत्या भाषेत, कोणत्या दिनांकाला, कोणत्या पृष्ठावर प्रसिद्ध झाला आहे, त्याचीही माहिती दिली जाते, की जेणेकरून सारांशावरून मूळ लेख आपल्या संशोधनाला उपयुक्त होईल असे संशोधकाला वाटल्यास त्याला तो मिळविणे सुकर जाईल. Chemical Abstracts, Biological Abstracts, Sociological Abstracts, Medicinal and Aromatic Plants Abstracts ही अशा कालिकांची काही जगप्रसिद्ध उदाहरणे! अशा स्वरूपाची कालिके आज इंटरनेटवर ऑनलाईन स्वरूपातदेखील उपलब्ध असून त्यामुळे संशोधनात्मक ग्रंथालयांना धन, वेळ, जागा आणि श्रम यांच्यामध्ये मोठी बचत साधणे शक्य झाले आहे.
काही संशोधनात्मक ग्रंथालयांतून स्वतंत्र माहिती व प्रलेखन विभाग (Information and Documentation Centre) कार्यरत असून त्याद्वारे संशोधकांना त्यांच्या विषयावरील अद्ययावत माहिती निरंतर मिळत राहील याची दक्षता घेतली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरदेखील अशी माहिती व प्रलेखन केंद्रे अस्तित्वात आली असून त्यांच्या सेवांचा लाभ संशोधकांना स्वतंत्ररीत्या घेता येतो. उदा. INSDOC (Indian National Scientific Documentation Centre), NASSDOC (National Social Science Documentation Centre), ENVIS (Environmental Information System), INIS (International Nuclear Information System), AGRIS (Agricultural Information System) इत्यादी.
माहिती परिस्फोटाच्या आजच्या युगात ज्ञानसाधनांचा आवाका इतका प्रचंड वाढला आहे की, कोणतेही ग्रंथालय ज्ञानसाधनांच्या बाबतीत कधीही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. हे वास्तव लक्षात ठेवून इतर ग्रंथालयांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून आपल्या ग्रंथालयातील वाचन साहित्य व सेवा तेथील संशोधकांना उपलब्ध करून दिल्यास आपल्या संशोधकांना कधी एखादे साहित्य तातडीने हवे असेल तर त्यांच्याकडून ते विनासायास मिळविता येऊ शकते.
समारोप :
संशोधनात्मक ग्रंथालय हे केवळ ग्रंथांचा संग्रह करणारी वास्तू नसून ते एक ज्ञानाचा एक जिवंत झरा (Virtual Spring of the Knowledge) असते. विशिष्ट विषयावरील अद्ययावत ज्ञानसाधने असणारे ते एक माहिती केंद्र असते. संशोधकांना लागणाऱ्या विशिष्ट विषयावरील माहितीचे स्वरूप जाणून घेऊन त्याप्रमाणे येथे ग्रंथालयप्रणाली तसेच द्यावयाच्या सेवा आणि कार्यपद्धतींची आखणी केली जाते. संशोधनात्मक ग्रंथालय म्हणजे माहितीचा प्रवास, तिच्या मूळ स्रोतापासून अंतिम उपयोगकर्त्यांपर्यंत त्वरेने आणि सहजगत्या होण्याकरिता कार्यरत असलेली एक सक्षम आणि सुसज्ज अशी ज्ञान यंत्रणा होय.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या लंकेला जाण्यासाठी सागरी सेतू निर्माणाच्या कार्यामध्ये जेवढे महत्त्वपूर्ण योगदान इवल्याशा खारूताईचे आहे, तेवढेच महत्त्वपूर्ण योगदान देशाच्या विकास आणि प्रगती कार्यक्रमांमध्ये संशोधनात्मक ग्रंथालयांचे आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
References :
1. The Shorter Oxford English Dictionary on Historical Principles, Oxford, 1985, p. 1804
2. The Advanced Learner's Dictionary of Current English. Oxford, 1952 p. 1069
3. http://www.knowledgecommission.gov.in
4. Wedgeworth, R. (ed) : World Encyclopedia of Library and Information Sciences. 3rd ed. - Chicago : American Library Association, 1993, p. 785
लोकसत्ता रविवार १९ सप्टेंबर २०१०
लोकमुद्रा पुरवणी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=101516:2010-09-17-11-20-04&catid=195:2009-08-14-03-11-12&Itemid=206
No comments:
Post a Comment