हेमंत शेटय़े, बुधवार, ११ ऑगस्ट २०१०
संपर्क- ९८१९६२१८१३
hemant.shetye@osslabs.biz
जगभरात सहस्रावधी ग्रंथालये कोहाचा वापर करीत आहेत. यात सार्वजनिक, शैक्षणिक, विशेष आणि खासगी ग्रंथालयाचा समावेश आहे. हे सारे कोहा वेबसाईटवर मोठय़ा प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांचा जणू एक स्वतंत्र समूह झाला आहे. यात अनुभवी, मान्यवर आणि तज्ज्ञ जसे आहेत तसेच नवोदित, शिकाऊ आणि अननुभवी लोकही सामील आहेत. ‘एकमेका करू साहाय्य अवघे धरू सुपंथ’ असा हा सारा प्रवास आहे.
न्यूझीलंडमधील क्याटिपो कम्युनिकेशन कंपनीने १९९९ च्या सुमारास कोहा ही मुक्त संकेत संगणकीय प्रणाली ग्रंथालयीन कामासाठी विकसित करण्याचे ठरविले. जानेवारी २००० पासून ती अमलात आणली. म्हणजे सध्याचे वर्ष हे कोहाचे दशकपूर्ती वर्ष आहे. कोहामुळे ग्रंथालय संगणक प्रणालीसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला.
न्यूझीलंडमधील आदिम मावरी जमातीच्या संस्कृतीतून कोहा हे नाव या प्रणालीसाठी वापरले आहे. कोहा या शब्दाचा त्या संस्कृतीतील अर्थ आहे ‘देणगी’. त्या अर्थाने त्यांनी ही जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. मुक्त संकेत प्रणाली म्हणून हे नाव अधिक शोभून दिसते. ग्रंथालयांमागील सांस्कृतिक प्रेरणा लक्षात घेता या नावातील संदर्भ आशयघन आणि लालित्यपूर्ण आहे.
मुक्त संकेत प्रणाली म्हणजे तिचा वापर कोणीही मुक्तपणे करू शकतो, गरजेप्रमाणे त्यात आवश्यक बदल करून ते विकसित करू शकतो आणि समविचारी लोकांना त्यात सहभागी करून घेऊ शकतो. या प्रणालीचा प्रसार करू शकतो. त्यासाठी कुणाची परवानगी अथवा शुल्क मोजण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे ती वापरणाऱ्या संस्थेचा अथवा व्यक्तीचा संगणक प्रणालीवरील मूळ खर्च वाचू शकेल आणि ती रक्कम अन्य पूरक सेवासुविधा, प्रशिक्षण आणि साहाय्यक उपकरणांसाठी वापरता येऊ शकते.
कोहा.ऑर्ग या वेबसाईटवर जाऊन कोणीही कोहा डाऊनलोड करू शकतो. ही वेबसाईट म्हणजे कोहाचे व्यासपीठ आहे. कोहास लागणाऱ्या पूरक संगणक प्रणालीसुद्धा मुक्त संकेत असल्याने एकूण किमतीत खूप तफावत येऊन कोहाचा वापर करणे तुलनेने कधीही किफायतशीर ठरते. कोहाच्या वेबसाईटवर कोहा कसे वापरावे याची सविस्तर मार्गदर्शक संहिता दिलेली आहे.
जगभरात सहस्रावधी ग्रंथालये कोहाचा वापर करीत आहेत. यात सार्वजनिक, शैक्षणिक, विशेष आणि खासगी ग्रंथालयाचा समावेश आहे. जगातील कोहा वापरणारे ग्रंथालय व्यावसायिक, विकसित करणारे तंत्रज्ञ, कोहा वापरण्यासाठी व्यावसायिक पातळीवर सेवासुविधा पुरविणाऱ्या जगभरातील स्वयंसेवी तसेच खासगी संस्था यांचे पत्ते, टेलीफोन नंबर, ईमेल्स आणि वेबसाइट्स दिल्या आहेत. कोहाच्या वेबसाईटवर अशा समविचारी तंत्रज्ञ, व्यावसायिकांसाठी चर्चा करण्याची सुविधा आहे. तेथे आपण आपल्या कोहाविषयक अडचणी विचारू शकतो. त्यास जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभतो. उत्तम प्रश्न आणि त्यास दिलेली उत्तरे भविष्यातही संदर्भासाठी लाभावीत यासाठी वेबसाईटवर विशेष संग्रह सुविधा आहे. त्यामुळे नवोदितांना या सुविधेचा वेळोवेळी एखाद्या संदर्भग्रंथासारखा उपयोग करता येतो.
थोडक्यात सांगायचे तर जगभरातील सारे कोहा वापरणारे या वेबसाईटवर मोठय़ा प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांचा जणू एक स्वतंत्र समूह झाला आहे. यात अनुभवी, मान्यवर आणि तज्ज्ञ जसे आहेत तसेच नवोदित, शिकाऊ आणि अननुभवी लोकही सामील आहेत. ‘एकमेका करू साहाय्य अवघे धरू सुपंथ’ असा सारा प्रवास असतो.
संगणक प्रणाली विकसित करणारे आणि वापरणारे एकाच व्यासपीठावर संवाद साधत असल्याने त्रुटी आणि उणीवा अल्पावधीतच दूर केल्या जातात. यामुळे कोहाची घोडदौड मोठय़ा वेगाने होत आहे. परिणामी अन्य संगणक प्रणालीपेक्षा ती तुलनेने अधिक अद्ययावत राहिली आहे.
कोहाची बलस्थाने
१. उच्च तंत्रज्ञान : सहस्रावधी सार्वजनिक आणि शैक्षणिक ग्रंथालयात कोहा यशस्वीपणे वापरले जात आहे. यामागील कारण म्हणजे सातत्यपूर्ण वापरातून सिद्ध झालेली मुक्त संकेत संगणक प्रणाली, लिनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम, माय एस्क्यूएलचा डेटाबेस, अपाचे २ वेब सव्र्हर, पर्लची पोग्रामिंग लँग्वेज आणि सोबत वेगवान झेब्रा ३९.५० तंत्रज्ञान ज्यामुळे ग्रंथालय तालिकेतील सहस्रावधी नोंदीतून अपेक्षित नेमक्या नोंदी क्षणार्धात संदर्भासाठी उपलब्ध होतात. या साऱ्या तांत्रिक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे वाचकाला कमीत कमी वेळात उत्तम दर्जाचे सूची संदर्भ मिळतात.
२. आंतरराष्ट्रीय प्रमाणिते : ग्रंथालयाशी निगडित अनेक आंतरराष्ट्रीय मानकांचा सुयोग्य वापर कोहाने केला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मार्क २१, एएसीआर २, तत्पर नोंदी शोधासाठी झेड ३९.५०, स्थानिक भाषांच्या सुविधेसाठी युनिकोड, ग्रंथालयीन सुरक्षा यंत्रणेसाठी एसआयपी/ एनसीआयपी ही त्यातील काही प्रमुख होत. कोहामध्ये या प्रमाणितांचा विचार साकल्याने केल्यामुळे त्यास एक प्रकारची एकसूत्रता आणि समावेशिकता प्राप्त झाली आहे.
३. वेब- आधारित : कोहा संपूर्णपणे वेबआधारे चालविता येत असल्याने त्यावर कुठूनही काम करता येते, तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते.
४. वाचकांची ओळखपत्रे: तसेच पुस्तकावरील बोधांकाची बार- कोडसहित लेबल्स ग्रंथालयात करता येतात.
५. सर्वंकष तालिका : ग्रंथालयातील तालिकेसह नेटवरील उपलब्ध संदर्भाचा वाचकाला एकत्रितपणे शोध घेता येतो. अमेझोनवरील पुस्तक परीक्षणे आणि गुगलवरील मुखपृष्ठे वापरून तालिका वाचकासाठी व्यापक, आकर्षक, पूरक आणि संदर्भपूर्ण करता येते.
६. वेब २ : या इंटरनेट आणि मोबाईलसाठी वापरणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ग्रंथालय आणि वाचक यांमधील सुसंवाद विविध प्रकारे साधणे शक्य होते. उदा. ब्लॉग, ग्रंथालयीन वार्तापत्रे, पुस्तक शिफारस सूची, वाचकांच्या प्रतिक्रिया आदी सुविधांमुळे ग्रंथालय वाचकाभिमुख होते.
७. लेखक नामे, विशिष्ट संकल्पना, भौगोलिक नावे यांच्या नोंदीत प्रमाण सातत्य राखण्याची सोय. यामुळे तालिकेचा दर्जा उंचावतो आणि नेमक्या नोंदीचा शोध सहज आणि तत्परतेने घेता येतो.
८. नेटवर्क प्रणालीवर आधारित असल्याने अनेक संगणकावर आणि ग्रंथालयाच्या अनेक शाखांसाठी वापरता एकाच संगणक प्रणालीवर काम करणे शक्य होते. यामुळे प्रत्येक शाखागणिक आणि संगणकागणिक होणारा खर्च मोठय़ा प्रमाणावर वाचतो.
९. एकाच प्रणालीवर अन्य शाखांची तालिका पाहता येणे शक्य असल्याने आंतर ग्रंथालयीन व्यवहार आणि माहितीचा परस्पर विनियोग सहज शक्य होतो.
१०. युनिकोडचा वापर केल्यामुळे स्थानिक भाषेत तालिकेसह अन्य ग्रंथालयातील व्यवहार शक्य होतील, भारतासारख्या बहुभाषिक देशात हे वैशिष्टय़ महत्त्वाचे ठरते.
११. ग्रंथ पडताळणी : ग्रंथालयात वर्षांखेरीस ग्रंथ पडताळणी केली जाते. बार कोड-मार्फत हे जिकिरीचे काम सुकर होऊन जाते. कोहामध्ये यासाठी खास साधनसुविधा पुरविली आहे.
१२. झेड २९.५० या आधुनिक सर्च इंजिनमार्फत नोंदींची एकात्मिक आणि समग्रलक्षी शोध घेण्याची सुविधा या आणि अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे यामुळे कोहा सक्षम, आकर्षक आणि आश्वासक प्रणाली बनली आहे. ग्रंथालयातील विविध मुख्य सेवा, त्यासाठी असलेली दालने, त्यांची तेथील कार्यपद्धती या साऱ्यांचा विचार कोहामध्ये बारकाईने केला आहे. त्यासाठी विभागवारी स्वतंत्र मोडय़ुल्स आहेत.
पुस्तक खरेदी : यात पुस्तक पुरविणाऱ्या विक्रेत्यांचा त्यांच्या वैशिष्टय़ानुसार डेटाबेस करता येतो. वाचक आणि तज्ज्ञ यांनी केलेल्या पुस्तक शिफारशीची दखल ठेवून त्यावर निर्णय घेता येतो. तसेच पुस्तक विक्रेत्यास पुस्तक विक्रीची सूचना दिल्यापासून पुस्तके प्राप्त होईपर्यंतच्या प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येण्याची सोय यात आहे.
पुस्तक देवघेव : यात महत्त्वाची सोय म्हणजे नेटवर्क बंद पडले तरी पुस्तकांची देवघेव यंत्रणा चालू ठेवता येते. पुस्तक परत करण्यात झालेल्या विलंबाबाबत वाचकांना ईमेलद्वारे सूचनापत्रे पाठवली जातात. बारकोड रीडरच्या साह्य़ाने पुस्तकाची देवाण-घेवाण करताना लागणारी पुस्तकांवरील बार-कोडिंग लेबल्स तसेच वाचकांची बारकोडयुक्त ओळखपत्रे बनविण्याची सुविधाही यात आहे.
वाचक डेटाबेस : यात वाचकांची ग्रंथालयीन धोरणानुसार विविध वर्गवारी, त्यांचे हक्क, बँकेप्रमाणे स्वतंत्र पासवर्डसह अकाऊंट उघडण्याची सोय, वाचकांचे पुस्तक परतीतील विलंबाबाबत दंड आणि पुस्तक देवघेवीचा यात समावेश आहे, सारा इतिहास नोंद करून ठेवण्याची सोय, आवडत्या पुस्तकांची सूची विषयवारीने करून ठेवण्याची सोय आणि वाचकाला आपले खाते ग्रंथालयात येण्यापूर्वी घरातही तपासता येण्याची सुविधा, तसेच नेमक्या वाचकाची ग्रंथालयाला आवश्यक माहिती तत्परतेने शोधता येईल अशा व्यवस्था पुरविल्या आहेत.
नियतकालिक नियंत्रण : मासिके, पाक्षिके, शोधपत्रिका यांची वर्गणी आगाऊ भरणे आवश्यक असते. ग्रंथालयात अनेक नियतकालिके येतात. त्यांचे वर्गणी कालावधीही भिन्न असतात. त्यावर नियंत्रण ठेवणे हे जिकिरीचे काम असते. याबाबत कोहामध्ये स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था केली आहे, ज्यामुळे प्रत्येक अंक वेळेवर आला की नाही ते पाहणे सोपे जाते.
ग्रंथालयीन अहवाल : ग्रंथालयात पुस्तक खरेदीपासून ते वाचकांना पुस्तक प्रत्यक्ष देईपर्यंत अनेक विविध प्रक्रिया घडत असतात. त्यांवर देखरेख ठेवणे आणि परिस्थितीनुसार आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अनेक प्रकारची माहिती आणि अहवाल आवश्यक असतात. उदा. या वर्षी एकूण किती पुस्तके आणि नियकालिके विकत घेतली, त्यावर प्रत्येकी किती खर्च झाला, किती वाचकांनी त्याचा लाभ घेतला, किती पुस्तकांना वाचकांचा प्रतिसाद नाही मिळाला, कोणत्या विषयाला अधिक मागणी आहे हे आणि असे अनेक प्रकारचे ग्रंथालयीन कामकाजाचे माहिती अहवाल ग्रंथालय समितीसाठी आवश्यक असतात. कोहामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार असे अहवाल तयार करण्याचीही सोय आहे.
तालिकीकरण : मार्क २१ वर आधारित सूक्ष्म तालिकीकरण करण्याची क्षमता हे कोहाचे सर्वात मोठे वैशिष्टय़. जलद तालिकीकरणासाठी गरजेनुसार त्यातील माहिती घटक कमी-जास्त करता येतात. शिवाय अन्य मोठय़ा ग्रंथालयातील तालिकेवरून अधिकृत नोंदी अचूकतेने नकलून घेता येतात. त्यामुळे नोंदीमध्ये सातत्य आणि अचूकता राखून वेळही वाचविता येतो. अशाच प्रकारे आपल्या तालिका नोंदीही अन्य ग्रंथालयांसाठी उपलब्ध करता येतात.
एकंदरीत या साऱ्या सुविधांचा आणि कोहाच्या भविष्यवेधी क्षमतेचा सारासार विचार केल्यास कोहाचा वापर करणे आर्थिक दृष्टीने सोयीचे तर आहेच शिवाय कोहा वापरणाऱ्या एका मोठय़ा जागतिक समूहाचे आपण सदस्य होतो, ज्यास एका सामाजिक सामीलकीचा आधार आहे. उत्तिष्ठता जागृत! प्राप्य कोहानीबोधत! नुसार आपण या देणगीचा लाभ करून घेतला पाहिजे आणि आपल्या ग्रंथालयाला सातत्याने अद्ययावत ठेवणाऱ्या या आश्वासक संगणक प्रणालीचा वापर केला पाहिजे.